Eknath Shinde: मुंबई कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा दुसरा टप्पा १० जूनपर्यंत सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. मार्च महिन्यात उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील मरिन ड्राइव्ह येथील दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीची पाहणी करताना शिंदे यांनी ही घोषणा केली.
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा १० जून रोजी मरीन ड्राइव्ह ते हाजी अली या मार्गावर सुरू होणार असला तरी वरळीच्या बाजूनेही सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिली. वांद्रे-वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा संपूर्ण कोस्टल रोड ऑक्टोबरपर्यंत खुला करण्यात येणार आहे.
पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, कोस्टल रोडच्या दोन ते तीन विस्तारीकरण सांध्यांमध्ये गळती आहे, ती पॉलिमर ग्राऊटिंगद्वारे दुरुस्त केली जाईल. पावसाळ्यातही पाण्याची गळती होऊ नये म्हणून बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व २५ सांध्यांना पॉलिमर ग्राऊटिंग लावण्याची शिफारसही मुख्यमंत्र्यांनी केली. दुरुस्तीच्या कामामुळे कोस्टल रोडवरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
"मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता. पण, भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले. फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते, आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरु होते. शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आली. १ लेन, जी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच खुली असते! मग आम्हाला नवीन टाईमलाइन देण्यात आली. आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय. मुंबई महानगरपालिका नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का? शिवाय, जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच!", असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले.