मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग होणार सुरू, वाचा संपूर्ण माहिती

Mumbai Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग होणार सुरू, वाचा संपूर्ण माहिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 10, 2024 07:49 PM IST

Mumbai Coastal Road will Start : ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सागरी किनारा मार्ग होणार सुरू
सागरी किनारा मार्ग होणार सुरू

मुंबईकरांसाठी एक खुशखबर असून मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होऊन सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते. साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

प्रकल्पामुळे होणारे फायदे

सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने,  जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

या प्रकल्पाच्या परिसरात ३२० एकर जमिनीवर भव्य सेंट्रल पार्क बनवण्यात येणार आहे. अशाच प्रकारे २०० एकर जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावले जातील. कोस्टल रोडवर ८० किमी प्रति तास वेगाने वाहने धावतील. मरीन ड्राइव्ह ते वरळी पर्यंत १०.५८ किमी लांब कोस्टल रोडचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी ४.३५ कि.मी. असून पुलांची एकूण लांबी २.१९  कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७२  कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास ११ मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र १११ हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी १५.६६ कि.मी. इतकी आहे. ७.५ कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी ७.४७ कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स,  हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हा प्रकल्‍प मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून  २५  फेब्रुवारी पर्यंत याची भौतिक प्रगती ८५.९१ टक्के तर आर्थिक प्रगती ८१.१९ टक्के इतकी झाली आहे. बोगदा खणन काम १०० टक्के पूर्ण झाले असून पुनःप्रापणाचे (रिक्लेमेशन) चे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रभिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आंतरबदल ८७ टक्के तर पुलांचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.

बोगद्याची वैशिष्ट्ये

किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्‍याची सुरुवात जानेवारी २०२१ मध्‍ये करण्‍यात आली होती. हा बोगदा जानेवारी २०२२ मध्‍ये पूर्ण झाला. दुसरा बोगदा खणण्‍याची सुरुवात एप्रिल २०२२ मध्‍ये करण्‍यात आली आणि हा बोगदा मे २०२३ मध्‍ये पूर्ण झाला. बोगद्याला ३७५ मि.मी. जाडीचे काँक्रीटचे अस्‍तर लावण्‍यात आलेले असून त्‍यावर अग्‍नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्‍नीरोधक फायरबोर्ड लावण्‍यात येत आहेत. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून आपत्‍कालिन निर्वासनासाठी प्रत्‍येक ३०० मीटरवर छेद बोगदे आहेत. उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्‍ये युटीलिटी बॉक्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.

IPL_Entry_Point

विभाग