Mumbai Chembur Fire: चेंबूर येथे एक भयंकर घटना घडली आहे. येथील सिद्धार्थ नगर येथील एका चाळीला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली असून या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा जळून मृत्यू झाला. सिद्धार्थ नगर येथे अनेक चाली असून या पैकी एका चाळीला आग लागली. सर्व जण साखर झोपेत असल्याने आग लागल्याचे कुणाला कळले नाही. यातच सर्व सात जणांचा जळून मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. सर्व जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पारिस गुप्ता (वय ७), मंजू प्रेम गुप्ता (वय ३०), अनिता प्रेम गुप्ता (वय ३९), प्रेम गुप्ता (वय ३०), नरेंद्र गुप्ता (वय १०) अशी आगीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची नावे आहेत. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या महितीनुसार घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किट झाला. यानंतर ही आग लागली. यावेळी गुप्ता कुटुंबीय गाढ झोपेत होते. त्यांना आग लागल्याचे लक्षात आले नाही. यामुळे झोपेतच त्यांचा जळून मृत्यू झाला.
चेंबूर येथे सिद्धार्थ नगर येथील एका चाळीला आज रविवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. यावेळी घरात सर्व जण झोपले होते. बाहेर असलेल्या नागरिकांना आगीची माहिती मिळताच त्यांनी आरडा ओरडा करून गुप्ता कुटुंबीयांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने भीषण रूप धारण केले होते. नागरिकांनी याची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. तो पर्यंत उशीर झाला होता. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी, पथकाने घरातून सर्व जणांना बाहेर काढले. यावेळी गुप्ता कुटुंबीय गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सर्वांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतांमध्ये लहान मुले, दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश असून आग लागल्यानंतर सगळे घराबाहेर पडण्यासाठी धडपडत होते.
गुप्ता परिवार राहात असलेली इमारत ही दुमजली होती. ही आग तळ मजल्यावर लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या पथकाने वर्तवला आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग भडकली. सर्व जण झोपले असल्याने त्यांना वेळीच जाग आली नाही. जेव्हा सर्वांना जाग आली असेल तो पर्यंत उशीर झाला होता.
संबंधित बातम्या