Mumbai News: मुंबईत पॉन्झी योजनेद्वारे गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सीएने १००० कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. याप्रकरणी शेकडो गुंतवणूकदारांची ओशिवरा पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली. आरोपी सीए फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अंबर दलाल असे फरार झालेल्या सीएचे नाव आहे. आरोपींनी भांडवल सुरक्षिततेची कायदेशीर हमी देऊन दरमहा २ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केली. गुंतवणुकदारांना या महिन्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी आरोपीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी आरोपीविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंबर दलाल आणि त्याची कंपनी रित्झ कन्सल्टन्सीविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास ९०० गुंतवणुकदारांचा सहभाग असलेला घोटाळा उघड झाला. आरोपीने दर महिन्याला २ टक्के परतावा आणि भांडवलाच्या सुरक्षेची कायदेशीर हमी देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केले. यामुळे अनेकांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. परंतु, गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना मार्च महिन्यात त्यांचे पैसे मिळाले नाहीत. याबाबत गुंतवणूकदारांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गुंतवणूकदारांनी अंबर दलालच्या कुटुंबाकडे चौकशी केली असता तो १४ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात अंबर दलाल याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.
संबंधित बातम्या