Mumbai: अंगाला दगड बांधून एका व्यक्तीची तलावात उडी, मुंबईतील मालाड येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: अंगाला दगड बांधून एका व्यक्तीची तलावात उडी, मुंबईतील मालाड येथील घटना

Mumbai: अंगाला दगड बांधून एका व्यक्तीची तलावात उडी, मुंबईतील मालाड येथील घटना

Nov 15, 2024 06:52 AM IST

Mumbai Man Dies After Jumping Into Talao: मुंबईतील मालाड परिसरात एका व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

अंगाला दगड बांधून एका व्यक्तीची तलावात उडी
अंगाला दगड बांधून एका व्यक्तीची तलावात उडी

Mumbai Suicide News: मुंबईतील मालाड परिसरातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका व्यक्तीने गुरुवारी सकाळी शांताराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती कर्करोगाचा रुग्ण होता आणि आजारपणाला वैतागून त्याने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल माने (वय, ५२) असे तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. अनिल हे मालाड पूर्व येथील हवाहिरा पार्कमधील अथर्व सोसायटीत वास्तव्यास होते. दरम्यान, अनिल माने यांनी गुरुवारी सकाळी ७.४० मिनिटांनी शांताराम तलावात उडी घेतली. तलावात उडी घेण्यापूर्वी एका व्यक्तीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अनिल यांचा मृतदेह पाण्यात बाहेर काढला. पाण्यात उडी मारण्यापूर्वी अनिल यांनी स्वतःच्या अंगाला दगड बांधल्याचे दिसून आले. पोलीस आणि अग्निशमन दलाने त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अनिल यांना कर्करोग होता आणि आजारपणाला वैतागून त्यांनी असे टोकाचे पाऊस उचलले. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबईत आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ

मुंबईत गेल्या तीन वर्षांत आत्महत्यांच्या घटनांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत मुंबईत आत्महत्येचे ४ हजार १७७ गुन्हे नोंदवण्यात आले. दरम्यान, २०२० मध्ये हा आकडा १ हजार २२९ होता, जो २०२२ मध्ये वाढून १ हजार ४९९ झाला. यात १ हजार २०० महिला आणि ३ हजार ७६५ पुरुषांचा समावेश आहे.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर