सरकारी बँकेच्या डेप्युटी मॅनेजरनं केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे मुंबईतील एका ५२ वर्षीय व्यापाऱ्यानं अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलिप हितेश शाह असं मृत व्यापाऱ्याचं नाव आहे. तो माटुंगा इथं कुटुंबासह राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून फिलिप शाह नैराश्यात होता. त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
शहा हे आपली सेडान कार घेऊन अटल सेतूवर गेले होते. त्यांनी ती कार एका ठिकाणी पार्क केली आणि समुद्रात उडी मारली. पुलावर एक कार उभी असल्याचं सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यानं बचाव पथकाला माहिती दिली. फिलिप शाह यांनी ज्या ठिकाणाहून समुद्रात उडी मारली, त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी दाखल झाले. शोध मोहिमेनंतर शहा यांचा मृतदेह सापडला.
शाह यांना बेशुद्ध अवस्थेतच तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कारमध्ये सापडलेल्या आधार कार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. या प्रकरणी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरकारी बँकेचे डेप्युटी मॅनेजर सुशांत चक्रवर्ती यांनी सोमवारी सकाळी शिवडी येथील पुलावर आपली एसयूव्ही पार्क करून समुद्रात उडी मारली. ते दक्षिण मुंबईतील बँकेच्या फोर्ट शाखेत काम करत होते. त्यांच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता.
नवी मुंबईतील जेएनपीटी येथील किनाऱ्यावर मंगळवारी एक मृतदेह वाहून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चक्रवर्ती यांची ओळख पटली. चक्रवर्ती यांच्या पश्चात पत्नी आणि सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू'चं उद्घाटन या वर्षी जानेवारीमध्ये करण्यात आलं होतं. सहा पदरी असलेला हा पूल २१.८ किलोमीटर लांबीचा असून देशातील सर्वात लांब सागरी पूल असल्याचं म्हटलं जातं.
(आत्महत्येची चर्चा काहींना विचलित करू शकते. मात्र, आत्महत्या रोखता येतात. दिल्लीतील सुमैत्री (०११-२३३८९०९०) आणि चेन्नईतील स्नेहा फाऊंडेशन (०४४-२४६४००५०) हे भारतातील काही प्रमुख आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक आहेत.)
संबंधित बातम्या