Mumbai Rain Updates: Mumbai High Tide Timing Today: मुंबईत आणि उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी शिरले असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मुंबई लोकलच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर समुद्राला मोठी भरती येणार असून महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने पहिल्या सत्रासाठी शाळांना सुट्टी जाहीर केली. त्यानंतर उंच भरतीचे कारण देत दुसऱ्या सत्रालाही सुट्टी जाहीर केली. भारतीय हवामान खात्याने मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. समुद्रात आज दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस आणि हाय टाइडमुळे उपनगरीय विभागातील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला, अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून दिली. पावसाचे पाणी रुळांवर पाणी साचल्याने अनेक स्थानकांवर सुमारे तासभर थांबावे लागले. सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी गाड्या संथ गतीने धावत आहेत. कल्याण ते कसारा दरम्यानच्या गाड्या मर्यादित वेगाने धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. सायन आणि भांडुप ते नाहूर स्थानकांदरम्यान रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पावसाचे पाणी रुळाच्या वर असल्याने सुमारे एक तास गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. आता पाणी थोडे कमी झाले आहे, त्यामुळे गाड्या पुन्हा सुरू होत आहेत. परंतु, सेवा अजूनही प्रभावित आहेत, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक आणि गर्दी वाढली आहे. हवामान आणि त्यानंतर च्या हवाई वाहतूक कोंडीमुळे मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांवर परिणाम होत आहे. सोमवारी (८ जुलै २०२४) दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून रात्री वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संबंधित बातम्या