Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. हवामान विभागाने मुंबईत येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कर्जतसह शहर आणि आसपासच्या भागात तापमान ४१-४३ अंश सेल्सियस पर्यंत वाढू शकते.
मुंबईत पुढील आठवड्यात मंगळवारी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली जाऊ शकते. उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईत शुक्रवारी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, गुरुवारी मुंबईचे तापमान ३३.५ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या काही दिवसांत दिवसाच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या हंगामातील सर्वोच्च दिवसाचे तापमान २१ मार्च रोजी ३८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आयएमडीच्या कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी शुक्रवारी कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस आणि ३५.८ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्य पातळीपेक्षा किंचित जास्त होते. दिवसाचे तापमान वाढत असताना, किमान तापमान तुलनेने स्थिर आहे, कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांमध्ये अनुक्रमे २४.३ अंश सेल्सिअस आणि २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे, जे सामान्य आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज (१३ एप्रिल २०२४) वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना, वीजांच्या कडकडाट, गारपीटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्चना विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, येथे, तर उर्वरित राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवारासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
संबंधित बातम्या