Mumbai News: मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात एका व्यक्तीने चालता बोलता एका ६० वर्षीय महिलेच्या अंगावरील ८० हजार किंमतीचे सोने लुटून नेले. याप्रकरणी महिलेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपासाला सुरुवात केली. फिर्यादी महिलेने दावा केला आहे की, एका व्यक्तीने तिला रस्ता चुकल्याचे बहाणा करत स्वत:जवळ बोलवून घेतले आणि तिच्या अंगावरील सोने लुटून पसार झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तीसोबत संवाद टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सरवाणी कुमावत (वय, ६०) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. कुमावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या मीरा भाईंदर रेल्वे स्थानकावरून घरी जात असताना हॉटेल प्यासाजवळ एका व्यक्तीने तिला थांबवले. त्याच्यासोबत एक लहान मुलगा होता. या व्यक्तीने कुमावत यांना पत्ता चुकल्याचा दावा केला आणि १००० रुपयांची मदत मागितली. परंतु, कुमावत त्यांनी असमर्थता दर्शवली. काही सेकंदात त्या व्यक्तीने कुमावत यांना गोड बोलून त्यांचे ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र आणि कानातले काढण्यास सांगितले. त्यानंतर हे दागिने एका रुमालात गुंडाळले. परंतु, आपल्या चातुर्याने त्याने दागिने काढून घेतले आणि कुमावत यांना रुमाल परत केला. तसेच हा रुमाल घरी पोहोचेपर्यंत उघडू नका, अशी सूचना केली. घरी गेल्यानंतर महिलेने रुमाल उघडून पाहिला असता तिला मोठा धक्का बसला. कारण या रुमालात दागिन्याऐवजी फक्त दगड होता.
दरम्यान, भाईंदरमधील नवघर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३८१ (फसवणूक) आणि ३(५) (सामान्य हेतू) अंतर्गत अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. रहिवाशांना, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अनोळखी लोकांशी संवाद साधू नका असे आवाहन एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. महिला आणि जेष्ठ नागरिक यांची फसवणूक करून त्यांच्या अंगावरील दागिने आणि रोख पैसे चोरून नेल्याची घटनेत वाढ झाली असून लवकरच या बोल बोच्चन टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
संबंधित बातम्या