Mumbai News: मुंबईतील वर्सोवा चौपाटीवर रविवारी गणेशमूर्तीचे विसर्जन होत असताना बोट उलटल्याची घटना घडली. या घटनेत १० ते १२ जण समुद्रात पडली. स्थानिक कोळी समाजातील लोकांनी तातडीने धाव घेत पाण्यात बुडलेल्या लोकांना वाचवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील वर्सोवा चौपाटीवर रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंधेरीच्या राजाचे विसर्जन केले जात होते. परंतु, गणेशमूर्तीचे विसर्जन करताना बोट अचानक उलटली. त्यामुळे बोटीतील १० ते १२ जण पाण्यात पडले. पाण्यात पडलेल्यांपैकी काही जण पोहोत सुरक्षित किनाऱ्यावर आले. तर, इतरांना वाचवण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी तातडीने मदतकार्य सुरू करत इतरांना वाचवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यात पडल्याने अनेकांच्या पोटात पाणी भरल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्रात गणेश विसर्जनादरम्यान अनेकजण पाण्यात बुडल्याची घटना उघडकीस आली. नाशिक, अमरावती, अकोल्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी गणेश विसर्जनदरम्यान पाण्यात बुडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले. मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.नाशिकच्या पार्थर्डी फाटा परिसरात ही घटना घडली.
पूर्ण नगर नदीपात्रामध्ये गणपती विसर्जन करताना दोन जण वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही तरुणांच मृत्यू झाला. गजानन ठाकरे आणि अमोल ठाकरे अशी या दोन तरुणांची नावे आहेत. तर, अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राजेश संजय पवार असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. अनिकेत विनायक कुलकर्णी असे बुडालेल्या मुलाचे नाव असून गणेश विसर्जनासाठी इतर मुलांसह नदीपात्रात गेला होता. याव्यतिरिक्त अकोल्यातही गणेश विसर्जनादरम्यान एकाचा बुडून मृत्यू झाला. गणेश गायकवाड (वय, १८) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा अकोला शहरातील अकोटफैल भागात वास्तव्यास होता.गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.