काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा

Dec 25, 2024 12:58 PM IST

Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने स्वत:सह आपल्या दोन भावांना कसे वाचवले? त्याचा थरारक अनुभव सांगितला आहे.

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा

Mumbai Boat Capsized: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ १८ डिसेंबर रोजी प्रवाशांना घेऊन जाणारी नीलकमल बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, ही दुर्घटना अनेकांसाठी काळ ठरली. पण त्यांची वेळ न आल्याने ते सुखरूप बचावले. अशीच एक घटना अहमदाबाद येथील एका तरुणासोबत घडली. हा तरुण आपल्या दोन चुलत भावांसह मुंबईतील प्रसिद्ध पर्यटळ स्थळ एलिफंटाला जात असताना त्यांची बोट समुद्रात बुडाली. पण या तरुणाने हुशारीने स्वत:सह आपल्या भावांचाही जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार,श्रावण चौधरी (वय,२७) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो अहमदाबाद शहरातील वस्त्राल भागातील रहिवाशी असून भंगारचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी श्रावण आपल्या चुलत भावांसह मुंबई फिरायला आला होता. गेट ऑफ इंडियाजवळ फोटो काढल्यानंतर त्यांनी बोटीतून एलिफंटाला जाण्याचा प्लान केला. मात्र, ते ज्या बोटीतून जात होते, त्या बोटीला अपघात झाला. नौदलाच्या नौकेचे इंजिन ट्रायल सुरू असताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि अंत्यत वेगाने नीलकमल या प्रवासी बोटला धडकली, ज्यात ११० हून अधिक प्रवासी होते.

ही धडक इतकी भीषण होती की, नीलकमल बोट लगेच समुद्रात बुडायला लागली. त्यावेळी श्रावण आणि त्याचे दोन्ही भाऊ देखील पाण्यात बुडू लागले. तितक्यात श्रावणला एक ड्रम तरंगताना दिसला. त्याने लगेच एका हाताने तो पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याचे चुलत भाऊ जीतू आणि नथाराम चौधरी यांना धरून ठेवले. जवळपास ३० मिनिटे मदत येऊ पर्यंत ते तरंगत राहिले. अखेरिस तटरक्षक दलाच्या जवानांनी तिघांची सुटका केली. या दुर्घटनेतून बचावलेल्या श्रावणने सांगितले की, तो माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अर्धा तास होता. मी मृत्यू जवळून पाहिला आहे. अजूनही समुद्रातील तो भयानक क्षण मी विसरू शकलो नाही.

सर्च अँड रेस्क्यू मोहिमेअंतर्गत बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि नौदल आणि तटरक्षक दलाच्या बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. दोन्ही जहाजांवरील ११३ जणांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला असून ९९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. नौदलाच्या जहाजावर सहा जण होते, त्यापैकी दोन जण बचावले. तर, तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर