मुंबई बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला आता आपल्या करिअरची चिंता सतावत आहे. या घटनेमुळे आपले करिअर संपुष्टात आले असून आपण मोठी चूक केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे. दरम्यान, आरोपीचा ड्रायव्हर राजर्षी बिडावत (३०) याला गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर त्याच्या बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला धडक दिल्याचा आरोप आहे. कारने धडक देऊन महिलेला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याने कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला.
२४ वर्षीय मिहिर शहाने अपघाताच्या वेळी कार आपणच चालवत असल्याची कबुली दिली आहे. मी मोठी चूक केली आहे, माझं करिअर संपलं आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. मिहीर शाह आणि त्याच्या दोन मित्रांनी जुहू येथील एका बारमध्ये व्हिस्कीचे १२ मोठे पेग रिचवले होते. बारमधून बाहेर पडल्यानंतर त्याने आणखी दारू विकत घेऊन प्यायल्याची माहिती आहे.
तसेच ड्रायव्हरला गाडी चालवण्याची परवानगी देण्यास भाग पाडले. राजेश शहा यांच्या सांगण्यावरून बिदावतने मिहीर शहाला गाडी चालवण्याची परवानगी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर चालकाला गुरुवारी मुख्य महानगर दंडाधिकारी (शिवडी कोर्ट) एस. पी. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. मिहीर शहाला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
मुंबई पोलिसांच्या तपास पथकाने गुरुवारी पहाटे अपघाताचे दृश्य पुन्हा तयार केले. मिळालेल्या माहितीनुसार , अपघातानंतर मिहिर शहा वांद्रे-वरळी सी लिंकच्या दिशेने वेगाने निघाला. पीडित महिला कारचे बोनेट आणि चाक यांच्यात अडकून राहिली होती.
अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. कारने दुचाकीला धडक दिली आणि नंतर पीडितेला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले, असे पोलिसांनी सांगितले.
मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर बिदावत यांना घटनास्थळी नेऊन घटनेची अधिक माहिती घेण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या