Mumbai BMW Accident: बीएमडब्ल्यू हिट अँड रनचा मुख्य आरोपी मिहीर शहा याला मुंबई शहर न्यायालयाने सहा दिवसांची म्हणजेच १६ जुलै २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीर शाहने आपल्या कारने एका महिलेला धडक दिली. या धडकेत महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. मिहीर शाह हा शिंदे गटातील नेत्याचा मुलगा असून अपघाताच्या तीन दिवसानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेनंतर आरोपीला किती लोकांनी मदत केली याचा शोध घ्यायचा आहे, असे मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीकडे कार ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, याचाही शोध घ्यावा लागेल आणि अपघातानंतर आरोपींनी फेकून दिलेल्या कारची नंबर प्लेट कुठे आहे? याचाही शोध घ्यावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिहिर शहा यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, मिहीर आणि ड्रायव्हर दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडे कोठडीमागण्याचे कारण नसल्याचा दावा त्यांनी केला. मिहीर शाह आणि ड्रायव्हरचे जबाब जुळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी मीहिर शहा यांच्या बीएमडब्ल्यू कारने प्रदीप नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत प्रदीप यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिहिर शहा यांचे वडील राजेश शहा यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. कार अपघातानंतर मिहीर शहा पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एकनाथ शिंदे म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. सरकार अपघातग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे, असेही ते म्हणाले.
“जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही; त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही पीडितेच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत. पीडित कुटुंबाला कायदेशीर आणि आर्थिक मदत करू. आम्ही त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपये देऊ. ते आमच्या कुटुंबातील आहेत”, असेही ते म्हणाले. मिहीर शहा याला मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
संबंधित बातम्या