मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai BJP Jagar Yatra: सण-उत्सव झाले, आता भाजप काढणार ‘मुंबई जागर’ यात्रा

Mumbai BJP Jagar Yatra: सण-उत्सव झाले, आता भाजप काढणार ‘मुंबई जागर’ यात्रा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 29, 2022 06:31 PM IST

BJP Mumbai Jagar Yatra: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जागर मुंबईचा ही यात्रा काढण्याची घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray - Ashish Shelar
Uddhav Thackeray - Ashish Shelar

BJP Mumbai Jagar Yatra: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री व दिवाळी सणाच्या माध्यमातून मुंबईकर जनतेपर्यंत गेल्यानंतर आता भाजप 'जागर मुंबईचा' अशी यात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून भाजप एकप्रकारे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात भाजप ही यात्रा काढणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईत फिरून भाजप मुंबईकरांशी संवाद साधणार आहे. जागर करणार आहे, असं शेलार यांनी सांगितलं. 'मतांसाठी लांगूलचालन करणाऱ्यांच्या विरोधात मुंबईकरांना सजग करण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या विकासाच्या आड कोण येतंय हे मुंबईकरांना दाखवून देण्याची गरज आहे, जे भ्रम आणि खोटे पसरवत आहेत त्यांना उघडे पाडण्याची गरज आहे. या उद्देशानंच आम्ही ही यात्रा काढणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी मुस्लिम शब्दाला आक्षेप

शिवसेनेला मराठी मुस्लिम संघटनेचा पाठिंबा अशी बातमी नुकतीच सामनात प्रसिद्ध झाली आहे. त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर लांगूलचालनाचा आरोप केला आहे. 'एक नेरेटिव सेट करण्यासाठी आणि येणारी मुंबई महापालिका निवडणुकीत मतांच्या बेगमीसाठी केलेली ही पेरणी आहे. या बातमीतील मराठी मुस्लिम शब्दाला भाजपनं आक्षेप घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या शिवसेनेनं जातीपाती, धर्माच्या पलीकडचं राजकारण करून मतांची आखणी आणि बांधणी केली होती. मग आता तुम्हाला जातीच्या नावानं मतं मागण्याची वेळ का आली, असा सवाल शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. मराठी मुस्लिम अशी मांडणी करताना मराठी जैन, मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत, अशी विचारणा शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसावर कब्जा करण्याचं स्वप्न पाहतच औरंगजेब गाडला गेला, परागंदा झाला तेच औरंगजेबी अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहे काय?, असा सवालही शेलार यांनी ठाकरेंना केला आहे.

WhatsApp channel