मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar:‘हे म्हणजे अती झाले आणि हसू आले!; बंद खोलीत बसून राहिले की..’, शेलारांचा ठाकरेंना टोला

Ashish Shelar:‘हे म्हणजे अती झाले आणि हसू आले!; बंद खोलीत बसून राहिले की..’, शेलारांचा ठाकरेंना टोला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 20, 2022 09:29 PM IST

घरात बंद खोलीत बसून राहिलो की,बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच,असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

शेलारांचा ठाकरेंना टोला
शेलारांचा ठाकरेंना टोला

मुंबई -देवेंद्र फडणवीस यांना पलटवार करताना उद्धव ठाकरे यांनी मोदींची लाट संपत आल्याने बाळासाहेबांचे नाव वापरत असल्याचा उल्लेख केला होता. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मुलाला पूर्ण करण्यास जमले नाही. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का? असा सवाल करत आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा टोला लगावला आहे.

भाजपच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर टीका करत शिवसेनेने प्रसिध्दीपत्रक काढले होते. त्याला आमदार आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. यामध्ये आशिष शेलार म्हणाले की, हिंदूत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मुलांना पूर्ण करण्यास जमले नाही, म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का? ते इतरांनी पूर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना?

पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते! फक्त, भरला आहे म्हणायला मोठे मन लागते' असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, उरला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप  वापरते असे जे त्यांना वाटते, हे म्हणजे अती झाले आणि हसू आले...!

पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा सनसनाटी टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंचा फडणीसांना टोला -

फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबूली दिल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही, हेच एकप्रकारे अधोरेखित केले, मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबूली आहे. असा घणाघात ठाकरे यांनी केला आहे.

IPL_Entry_Point