मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar: जळजळ, मळमळ होत असेल तर धौती योग घ्या; ‘सामना’च्या अग्रलेखाला भाजपचं सडेतोड उत्तर

Ashish Shelar: जळजळ, मळमळ होत असेल तर धौती योग घ्या; ‘सामना’च्या अग्रलेखाला भाजपचं सडेतोड उत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 28, 2022 10:51 AM IST

Ashish Shelar Slams Shiv Sena: शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपच्या मराठी दांडियावर करण्यात आलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray - Ashish Shelar
Uddhav Thackeray - Ashish Shelar

Ashish Shelar Slams Shiv Sena: भारतीय जनता पक्षानं मुंबईत आयोजित केलेल्या मराठी दांडियावर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे. कमळाबाईच्या मराठी दांडियानं शिवसेना इंचभरही हलणार नाही, असा बोचरा टोला शिवसेनेनं हाणला आहे. शिवसेनेच्या या टीकेला भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेनेच्या अग्रलेखास उत्तर दिलं आहे. 'अयोध्येतील राम मंदिरासाठी काढल्या जाणाऱ्या वर्गणीची ज्यांनी खिल्ली उडवली. अडीच वर्षे राज्यात सत्ता असताना देवांना बंदीवान केलं. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवावर निर्बंध लादले, त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेली उत्सवाची धूम पाहवत नाही. त्यांच्या पोटात मळमळ होतेय, मुरड पडतेय म्हणून ते जळजळ व्यक्त करत आहेत. मराठी माणसाचा उत्सव आणि आनंद पाहून ज्यांना असा त्रास होतोय, त्यांनी 'धौती योग' घ्यावा, असा खोचक सल्ला शेलार यांनी दिला आहे.

भाजप दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करतो. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचं कधीच राजकारण केलं नाही. करोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळं आम्ही जे केलं, त्याचं 'करून दाखवले' असे होर्डिंग लावले नाहीत, असा टोलाही शेलार यांनी हाणला आहे.

'आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता 'थापा' पण राहिला नाही आणि उत्सवही राहिला नाही. आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन त्यांचं गर्वहरण केलं. त्यामुळं त्यांची जळजळ व्हायला लागली. गिरणगावात भाजपनं मराठी दांडिया आयोजित केला त्याचा त्रास 'सामना'कारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला?, असा सवाल त्यांनी केला आहे.

'अहंकार, गर्वहरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करून तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत देवीनं क्लेशांपासून मुक्त करावं, अशी प्रार्थनाही शेलार यांनी केली आहे.

IPL_Entry_Point