मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar : फडणवीस ‘कृष्ण’ अन् शिंदे ‘कर्ण’; आशिष शेलार म्हणाले, 'महाभारत बदललंय'

Ashish Shelar : फडणवीस ‘कृष्ण’ अन् शिंदे ‘कर्ण’; आशिष शेलार म्हणाले, 'महाभारत बदललंय'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 20, 2022 02:03 PM IST

Ashish Shelar : भारत नवभारत होत आहे. महाभारतही थोडं बदलतंय असं आता वाटतंय असं सांगताना आशिष शेलार यांनी महाभारतातला किस्सा सांगितला.

देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला बाजूला काढलंय : आशिष शेलार
देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला बाजूला काढलंय : आशिष शेलार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात अनेक उत्सव साजरे झाले नाहीत. यंदा दहीहंडी कोणत्याही निर्बंधाशिवाय झाली. यावरून आशिष शेलार म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजा विराजमान झाला नाही. पण यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार आहे." राज्यातील सत्तांतरावरून बोलताना आशिष शेलार यांनी आता महाभारत बदलतंय असं म्हटलं.

भारत नवभारत होत आहे. महाभारतही थोडं बदलतंय असं आता वाटतंय असं सांगताना आशिष शेलार यांनी महाभारतातला किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध अटळ होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगायला गेले होते की, युद्ध अटळ आहे बाजूला हो. तु या युद्धाचा भाग होऊ नको, कारण अधर्म आणि धर्म यामध्ये युद्ध आहे. कर्णाने भगवान श्रीकृष्णाचं ऐकलं नाही. युद्ध अटळ होतं, कौरव पराजित झाले, कर्णाचा वध झाला."

महाभारतातला दाखला दिल्यानंतर पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आजचं महाभारत वेगळं आहे. देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला युद्धातून बाजूला काढलंय. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील या लढाईत आणि कृष्णही आमच्यासोबत आहे आणि कर्णही आमच्यासोबत आहे. महापालिकेत भाजपचा महापौर आता कोणी थांबवू शकत नाही. मुंबईत मुंबईकरांचे राज्य येण्यापासून कोणी रोखू शकत नाही."

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी म्हटलं की, येत्या पालिका निवडणुकीत फक्त वरळीच नाही तर पूर्ण मुंबईत भाजपचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हा हिंदू सणांना विसरला आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकलेत. वरळीतच नव्हे तर संपूर्ण मुंबईत भाजपच सत्ता मिळवेल. आमच्या पाठिंब्यानेच तुम्ही वरळीत निवडून आला आहात असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या