BEST Conductor Saves Passenger Life: बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे एका ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. वृद्ध व्यक्ती रविवारी दुपारी घाटकोपर ते लोकमान्यनगरला जाणाऱ्या बसमधून प्रवास करताना अचानक त्याला हृदयविकाराच झटका आला. ही बाब कंडक्टरच्या लक्षात येताच त्यांनी वेळ न घालवता प्रवाशाला सीपीआर दिला. ज्यामुळे व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या कामगिरीमुळे संबंधित कंडक्टरचे कौतूक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित रामचंद्र पवार (वय, ६२) असे हृदयविकाचा झटका आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, अर्जुन पांडुरंग लाड असे त्यांचा जीव वाचवणाऱ्या कंडक्टरचे नाव आहे. दरम्यान, रविवारी अर्जुन लाड हे घाटकोपर आगारातील ३४ क्रमांकाची ठाण्यातील लोकमान्यनगरला जाणाऱ्या वातानुकूलित बसमध्ये कंडक्टर होते. याच बसमधून रोहिदास आणि त्यांची पत्नी ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होते. परंतु, बस ठाण्यातील रोड नंबर १६ येथे पोहोचताच रोहिदास यांना छातीत वेदना जाणवू लागल्या. रोहिदास यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अर्जुन यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रवाशाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळानंतर रोहिदास काहीसे शुद्धीवर आले.
यानंतर पवार यांना तातडीने खासगी वाहनाने पुढील उपचारांसाठी कामगार रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर पुढील उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. पवार यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली. प्रवासी आणि बेस्टचे अधिकारी दोघांनीही अर्जुन लाड यांच्या निर्णायक कृतींचे कौतुक केले आणि सार्वजनिक वाहतुकीतील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अशा कौशल्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या सर्व वाहकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती काळात किंवा संकटकाळी याचा वापर करुन स्वत:चा किंवा प्रवाशांचा जीव वाचवणे हे या प्रशिक्षणामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. अर्जून लाड यांनी सीपीआर प्रशिक्षण घेतले आहे. याचाच वापर करून त्यांनी प्रवाशाचा जीव वाचवला आहे, अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्याकडून मिळत आहे.
संबंधित बातम्या