Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकल नंतर बेस्ट बस प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्ट सेवा तोट्यात असल्याने बेस्टच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ दुप्पट केली जाणार आहे. नव्या दरानुसार बेस्ट बसचे भाडे हे ५ रुपयांवरून १० रुपये तर एसी बसचे भाडे हे ६ वरून १२ रुपये करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
बेस्ट बस सेवा ही मुंबईतील प्रमुख सेवा आहे. बेस्टमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी गुरुवारी बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाडेवाढ व बेस्टमधील बसचा ताफा या बाबत माहिती घेतली.
यावेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असून यावर आणखी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे बैठकीत ठरले. सध्या बेस्ट तोट्यात असून हा तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. या सोबतच कर्मचाऱ्यांची देणी बेस्टला द्यायची आहे. त्यामुळे भाडेवाढीवर विचार सुरू आहे. या बाबत अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
मुंबईत काही दिवसांपूर्वी रिक्षा व टॅक्सीचे भाडे वाढवण्यात आले होते. टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली तर कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी भाडे वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत ऑटो रिक्षाचे किमान भाडे २३ तर टॅक्सीचे भाडे ३१ झाले आहे. व कुल कॅबचे भाडे हे ४८ रुपये झाले.
पुण्यात देखील पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसाठी तब्बल १ हजार बस घेतल्या जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन ५०० बस विकत घेतल्या जाणार आहे. पुणे आणि पिंपरीसाठी तब्बल ६००० बसची गरज आहे.
संबंधित बातम्या