मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढल्या, ९०४ पानांचं आरोपपत्र दाखल

मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढल्या, ९०४ पानांचं आरोपपत्र दाखल

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 14, 2022 07:42 AM IST

मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात प्रवीण दरेकरांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरेकरांविरोधात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर (हिंदुस्तान टाइम्स)

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या वेळी बनावट  कागदपत्रांच्या आधारे उमेदवारी दाखल केल्याचा आरोप असणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. दरेकर यांच्या विरोधात तब्बल ९०४ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण दरेकरांसह आणखीनही दोन जणांवर हे आरोपपत्र दाखल केलं गेलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर यांनी बोगस कागदपत्रं सादर करुन उमेदवारी दाखल केली असा आरोप प्रवीण दरेकरांवर करण्यात आला होता. या आरोपपत्रात भाजपचे प्रवीण मारगज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. एमआरए मार्ग पोलिसांनी शुक्रवारी तब्बल ९०४ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं गेलं आहे. या आरोपपत्रात २९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे नेते धनंजय कापसे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. १९९७ साली प्रतिज्ञा सहकारी सोसायटीचे सदस्य म्हणून प्रवीण दरेकर यांनी   मजूर म्हणून नोंदणी केली होती. चुकीची नोंदणी करुनही दरेकर यांनी दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असा आरोप प्रवीण दरेकरांवर ठेवण्यात आला आहे. 

काय सांगतय आरोपपत्र?

या आरोपपत्रात प्रवीण दरेकर यांच्यासोबतच प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल ९०४ पानाच्या या आरोपपत्रात या तिनही आरोपींविरोधात आयपीसी कलम १९९ , २००, ४०६, ४१७, ४२०,४६५ ,४६८ , ४७१ आणि १२० -ब या कलमांअंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ज्या  २९ साक्षीदारांच्या साक्षीची नोंद केलीय त्यात काही शासकीय अधिकारी तसंच मुंबई बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळेच आता प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झालीय हे मात्र निश्चित. आता या विरोधात प्रवीण दरेकर काही पावलं उचलणार का हेही आगामी काळात कळेल.

WhatsApp channel