Mumhai Rains: मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये उद्या (शुक्रवार, २६ जुलै २०२४) नियमितपणे सुरू राहतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.
‘बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती आहे. अधिक माहितीसाठी शाळा आणि महाविद्यालये व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे’, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अशरक्ष: झोडपून काढले. रात्रभर झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांना त्रास सहन करावा लागत असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गुरुवारी पहाटे चार ते दुपारी एक या वेळेत मुंबईतील अनेक भागात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत १०० किंवा ११२ वर कॉल करण्याचे आवाहन केले.एनडीआरएफ पथके तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली असून लष्कराच्या एअरलिफ्टिंग तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास एअरलिफ्टिंग ऑपरेशन तयार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घरातच राहावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जुहू बीचवरील उंच लाटांमुळे पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक भागांतील पूरस्थितीचा आढावा घेतला.