मुंबई – विमानात हवाई सुंदरीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी बांगल्यादेशी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मस्कत येथून मुंबई विमानतळावर विमान दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो बांग्लादेशचा नागरिक असल्याचं समोर आलं आहे. मोहम्मद दुलाल (वय ३०) असे या प्रवाशाचे नाव आहे. दरम्यान आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना ६ सप्टेंबर रोजी विस्तारा कंपनीच्या विमानात घडली. विमान मस्कत येथून मुंबईकडे येत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने २२ वर्षीय महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमान मुंबईत लँडिंगला अर्धा तास शिल्लक असताना महिला कर्मचारी आरोपीच्या सीटजवळ ट्रे उचलण्यासाठी आली असतानाच त्याने अश्लील चाळे केले. त्यानंतर महिला पुढे जात असताना त्याने तिला पाठीमागून मिठी मारून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने भेदरलेल्या महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलावले. विमानातील स्टाफ व सहप्रवाशांनी महिलेला आरोपीच्या तावडीतून सोडवले. त्याने मध्ये पडणाऱ्या लोकांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले व विमान मुंबईत उतरल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी बांगलादेशचा नागरिक असल्याने बांगलादेश दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात अश्लील कृत्यांच्या घटना वाढल्या आहेत. सहप्रवाशांवर लघुशंका करणे, महिला प्रवाशी व कर्मचाऱ्यांचा विनयभंग आदी घटना वाढल्या आहेत.