चेंबूरमध्ये भीषण अपघात..! भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली, तीन जण जागीच ठार तर तीन गंभीर-mumbai accident three dead and three were injured after car overturns and hits tanker in chembur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चेंबूरमध्ये भीषण अपघात..! भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली, तीन जण जागीच ठार तर तीन गंभीर

चेंबूरमध्ये भीषण अपघात..! भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली, तीन जण जागीच ठार तर तीन गंभीर

Sep 02, 2024 12:34 AM IST

Chembur accident : चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार दोनदा पलटी खाऊन थांबलेल्या टँकरला धडकली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली
भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली

मुंबईतील चेंबूरच्या आरसीएफ परिसरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यातच दोन वेळी पलटी होऊन रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरवर आदळली. या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास घडला.

हरिचरण दास (२३), प्रमोद प्रसाद (३५) आणि हुसेन शेख (४०) अशी मृतांची नावे आहेत. तस या अपघातात चालक जावेद खान (३०), मनोज (३०) आणि संजय सिंह (३९) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी कार चालकाच्या रक्ताचे नमुने गोळा केले आहेत असून अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता की नाही हे शोधण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्व मृत आणि जखमी तरुण चेंबूरमधील लक्ष्मी नगर आणि शेजारच्या भागातील रहिवासी आहेत. तसेच ते एकमेकांचे मित्र होते. अपघातग्रस्त तरुणांपैकी बहुतेक जण ट्रक आणि ऑटो-रिक्षा चालक म्हणून काम करत होते. तर कारचे मालक खान हे टुरिस्ट चालक होते. रविवारी त्यांना सुट्टी असल्याने त्यांनी त्यांच्या मित्रांसह फिरायला जायचे ठरवले. दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास ते  गव्हाणपाडा येथून चेंबूर येथील वाशीनाका परिसरात जात असताना हा अपघात झाला.

अपघातावेळी कार भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार दोनदा पलटी खाऊन थांबलेल्या टँकरला धडकली. स्थानिक नागरिक व पोलिसांनी सर्वांना राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार ओव्हरस्पीड होता. जेव्हा ड्रायव्हरने ब्रेक दाबले तेव्हा कार  उलटली व दोनदा पलटी खाऊन टँकरला धडकली. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने घटनास्थळाजवळ स्थानिक नागरिक गोळा झाले व मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

बेदरकारपणे व निष्काळजीपणे गाडी चालवून तीन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल कार चालकाविरुद्ध पोलिस गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करत आहेत.

विभाग