Mumbai Accident News: अंत्यविधीतून परत असताना एका तरुणावर काळाने घाला घातला. आपल्या पुतण्यासह घरी येत असताना मुंबईतील दिंडोशी उड्डाणपुलावर भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधीच घरातील एका महिलेच्या निधनाने शोकाकुळ झालेल्या कुटुंबाला आणखी एका सदस्याला गमवावे लागल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रमेश जोरे (वय ३६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो घाटकोपर येथील मंगलमूर्ती सोसायटीत राहायला होता. बहिणीचा अंत्यविधी आटोपून मृत रमेश हा त्याचा पुतण्या नरेश (वय, १८) याच्यासह आपल्या सुझुकी बर्गमन दुचाकीने घरी परत येत होता. मात्र, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दिंडोशी उड्डाणपुलावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर रमेश आणि नरेश दोघेही दुचाकीवरून खाली फेकले गेले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ताबडतोब जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी रमेशला मृत घोषित केले.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नरेशने सांगितले की, 'आम्ही पडल्यानंतर काय झाले ते मला आठवत नाही. परंतु, जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला पोलीस आमच्या भोवती दिसले आणि माझे काका बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. यानंतर मी हॉस्पिटलमध्ये काकांच्या प्रकृतीबद्दल विचारले, तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले.
नरेशच्या जबाबावरून दिंडोशी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) (सदोष मनुष्यवध) आणि २८१ (धोकादायक वाहन चालविणे) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४, १३४ (अ) आणि १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा रंग आठवत नसल्याचे नरेशने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करून वाहनाची ओळख पटविण्यासाठी आणि चालकाचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती दिंडोशी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.
संबंधित बातम्या