Mumbai Coastal Road: मुंबईसह राज्यातील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात एक १९ वर्षीय तरुणी ही ठार झाली आहे. तर तिचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री ८ च्या सुमारास झाला. या वाढत्या अपघातांमुळे या मार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गार्गी चाटे (वय १९) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर तिचा मित्र संयम साकला हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही त्यांच्या स्विफ्ट कारने प्रभादेवी येथून मरिन ड्राईव्हला जात होते. संयम साकला हा गाडी चालवत होता. तर गार्गी ही त्याच्या शेजारी बसून होती. टयांची गाडी ही भरधाव वेगात होती. त्यांची कार ही हाजी अली दर्ग्याच्या वळणावर आली असता, संयम साकलाचे त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे त्यांची कार ही कोस्टल रोडच्या लोखंडी रेलिंगला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, यात कारचा चक्काचूर झाला. एवढेच नाही तर कार दोन वेळा पलटी देखील झाली. यात गार्गी चाटे हीचा जागीच मृत्यू झाला तर साकेत हा गंभीर जखमी झाला गार्गी ही मूळची नाशिकच्या गंगापूर येथील रहिवासी आहे. ती दक्षिण मुंबईतील एका मोठ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती प्रभादेवी परिसरात वास्तव्याला होती.
हा अपघात होताच कोस्टल रोडवरून जाणाऱ्यांनी तातडीने गाड्या थांबवत दोघांना बाहेर काढले. गार्गी चाटे व संयम साकला या दोघांना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. कार लोखंडी रेलिंगला धडकल्याने गार्गी हिच्या डोक्याला जोरदार मार लागला. तिला दवाखान्यात नेत असतांना वाटेततिचा मृत्यू झाला. तर संयम साकला याला ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हा अपघात कसा झाला या बाबत तपास सुरू आहे. संयम साकला हा सीएचे शिक्षण घेत असून कार चालवतांना मद्यप्राशन केले होते का, याचा देखील तपास केला जात आहे. या मार्गावर भरधाव वेग हा वाढत्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या