BMW Car Hits two People In Mulund: राज्यभराात लाडक्या बाप्पाच्या स्वागाताची तयारी सुरू असताना मुंबईतील मुलुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली. मुलंडमध्ये पहाटे एका भरधाव बीएमडब्लू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना चिरडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. प्रितम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत असताना एका भरधाव बीएमडब्लू कारने त्यांना चिडरले. या अपघातात प्रीतमचा मृत्यू झाला आहे. तर, प्रसाद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या घटनेनंतर जखमींची मदत करण्याऐवजी कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
चेंबूर पश्चिमेकडील छेडा नगर जंक्शन येथे क्रेनने एका ८० वर्षीय महिलेला धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. तिथून जाणाऱ्यांनी पोलिसांना फोन केला आणि सकाळी सातच्या सुमारास तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
मालाडमध्ये एसयूव्हीच्या चाकाखाली चिरडून एका २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. शहाना इक्बाल काझी (वय २६) असे मृ्त्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शहाना या गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मालाडच्या मेट्रो स्थानकावरून घरी परतत असताना लिंक रोडवरील ऑरिस बिल्डिंग कॉम्प्लेक्सजवळ फोर्ड एंडेव्हरने तिला धडक दिली. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारे अनुप सिन्हा असे या एसयूव्हीचालकाचे नाव असून त्याने शहानाला जवळच्या रुग्णालयात नेले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक केली. वैद्यकीय तपासणीत अपघाताच्या वेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला बुधवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.