Mumbai News: मुंबईतील पवई येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती बँक बूक अपडेट करण्यासाठी घरातून निघाले होते. परंतु, पवईतील लुबीनी बुद्धविहार समोर रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. घटनास्थळी उपस्थित असेलल्या लोकांनी त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस दुचाकीस्वारचा शोध घेत आहेत.
पद्मसिंग नेपाळी (वय, ८५), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नेपाळी हे त्यांच्या कुटुंबासह चांदिवली येथे राहत होते. दरम्यान, नेपाळी हे शुक्रवारी दुपारी २ वाजता ते त्यांचे बँक पासबुक अपडेट करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जात होते. लुबीनी बुद्धविहार समोर रस्ता ओलांडत असताना मनुभाई चाळ या दुचाकीस्वार त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत नेपाळी पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीस्वार आणि वाटसरूंनी नेपाळीला ऍक्सन हॉस्पिटलमध्ये आणले, तेव्हा डॉ महेश सोनटक्के यांनी आयसीयूमध्ये दाखल केले. मात्र, ऑक्सिजनची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी नेपाळीला विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
नेपाळी यांचे नातेवाईक दुसऱ्या रुग्णालयाची व्यवस्था करत असताना दुचाकीस्वार तिथून निघून गेला. त्यानंतर ७.१५ च्या सुमारास कूपर रुग्णालयात नेपाळीला मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची ८० वर्षांची पत्नी आणि चालक म्हणून काम करणारा मुलगा असा परिवार आहे.
याप्रकरणी नेपाळीच्या सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि २८१ (रॅश ड्रायव्हिंग) तसेच कलम १३४ (अ) आणि १३४ (ब) (आपत्कालीन मदत पुरवण्यात अयशस्वी होणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मोटरसायकलचा नंबर ट्रेस केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आणि लवकरच त्याला अटक करू.'
संबंधित बातम्या