Mumbai Chembur Fire News: मुंबईतील चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
मुंबईतील एका दुमजली दुकान आणि रहिवासी इमारतीला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत तीन अल्पवयीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. या तळ मजला दुकान म्हणून आणि वरचा मजला राहण्यासाठी म्हणून वापरला जात होता. सुरूवातीला तळमजल्यावर आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पॅरिस गुप्ता (वय, ७), मंजू प्रेम गुप्ता (वय, ३०), अनिता प्रेम गुप्ता (वय, ३९), प्रेम गुप्ता (वय, ३०), नरेंद्र गुप्ता (वय, १०), विधी गुप्ता (वय, १५), गितादेवी गुप्ता (वय, ६०) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.
एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामात अडथळे येत असतील तर त्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी शासन योग्य ती काळजी घेईल. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या संदर्भात बैठक घेऊन चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला महिन्याला लागणारी मदतीची आवश्यकता भासल्यास तीही सरकार करेल, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले.