मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  KEM Hospital : रुग्णांच्या रिपोर्टपासून बनवल्या कागदी प्लेट; केईएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

KEM Hospital : रुग्णांच्या रिपोर्टपासून बनवल्या कागदी प्लेट; केईएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Jul 07, 2024 06:06 PM IST

KEM Hospital Paper Plates News: केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या फोल्डरपासून कागदी प्लेट बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मुंबईतील केईएम रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार उजेडात
मुंबईतील केईएम रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार उजेडात

KEM Hospital Viral Video: केईएम रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या अहवालाच्या फोल्डरमधून कागदी प्लेट्स बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. यानंतर प्रशासनाने सहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स- रे अशा विविध वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर रुग्णांना अहवालासोबत कागदी फोल्डर दिले जाते. मात्र, याच फोल्डरपासून कागदी प्लेट बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडियावर या संदर्भात व्हिडिओ शेअर केला. तसेच रुग्णालय प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्याचा त्यांनी आरोपी देखील केला आहे.

या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार

केईएम रुग्णालयाच्या डीनची भेट घेतल्यानंतर याबाबत माहिती देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ही अत्यंत गंभीर बाब आहे. रुग्णांच्या वैद्यकीय अहवालातील फोल्डर कागदी प्लेट तयार करण्यासाठी वापरण्यात आली, जे नियमांचे उल्लंघन आहे. त्या कागदी प्लेटवर रुग्णांची खाजगी माहिती दिसत आहे. सोमवारी या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून याप्रकरणी सहा जणांना नोटीस पाठवण्यात आली.

एकसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक

याप्रकरणी महानगरपालिकाने रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

WhatsApp channel
विभाग