Mumbai Suicide News: मुंबईतील जीटीबी नगर रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. या व्यक्तीने कर्जाला वैतागून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमधून मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ मजली.
शाहू माने (वय, ५७) असे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शाहू मानेने २३ डिसेंबरच्या मध्यरात्री मुंबईतील जीटीबी नगर स्टेशनजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाइड नोट सापडली, ज्यात त्याने कर्जाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मयत शाहू माने याने डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय विस्कळीत झाला. परिणामी त्यांच्यावरील कर्ज वाढत गेले. कर्ज फेडता येत नसल्याने कर्जदारांनी त्याच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून माने कंत्राटी नोकरीवर काम करत होते. कर्जदारांनी काही दिवसांपूर्वी त्यांना मारहाण देखील केली. कर्जदारांचा त्रास वाढल्याने शाहू माने यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील तपास करीत आहेत.
भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.