Ghatkopar Businessman Suicide News : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरून पाण्यात उडी मारून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१७ जुलै २०२४) दुपारच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी संबंधित व्यक्तीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. कर्जाला वैतागून या व्यक्तीने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भावेश सेठ (वय, ५६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भावेश हे घाटकोपर पश्चिमेतील रहिवासी असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता. त्याच्यावर मोठे कर्ज होते, अशीही माहिती मिळत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भावेश वांद्रे वरळी सी-लिंक येथे गेला. त्यानंतर त्याने आपला मुलगा स्मिथ सेठ (वय, २८) याला शेवटचा फोन केला आणि लगेच पाण्यात उडी मारली. सीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मात्र, मच्छिमार समुदायाच्या स्थानिकांना सेठचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी पोलिसांची वाट न पाहता तात्काळ त्यांची मासेमारी बोट घेऊन बचाव मोहीम सुरू केली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी भावेशला भाभा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपासादरम्यान पोलिसांना भावेशने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. यात त्याने “सॉरी बेटा, कुटुंबाची काळजी घे” असे लिहिले होते. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता भावेश याच्यावर कर्ज होते. ज्यामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. कर्जाला वैतागूनच भावेशने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
याआधीही मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. संबंधित तरुण एका खासगी बँकेत नोकरी करत होता. घटनेच्या दिवशी तो टॅक्सीने कार्यालयातून घरी जात होता. यावेळी त्याने वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असताना टॅक्सी थांबवली आणि पुलावरून थेट समुद्रात उडी मारली. आकाश सिंह असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता काही महिन्यांपूर्वी आकाशचे त्याच्या मैत्रीणीसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. तेव्हापासून तो नैराश्यात होता.