मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीसोबत विचित्र घडलं; रस्त्यानं जाणाऱ्या ट्रकमधील लोखंडी वस्तू डोक्यात पडल्यानं मृत्यू

मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीसोबत विचित्र घडलं; रस्त्यानं जाणाऱ्या ट्रकमधील लोखंडी वस्तू डोक्यात पडल्यानं मृत्यू

Jun 25, 2024 01:14 PM IST

Mumbai News: मुंबईच्या वांद्र परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे.

मुंबईत मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीसोबत विचित्र घटना
मुंबईत मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीसोबत विचित्र घटना

Mumbai Bandra News: मुंबईच्या वांद्रे परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीसोबत विचित्र घटना घडली. कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन जाणार्‍या ट्रकमधील लोखंडी वस्तू डोक्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर वांद्रे परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

विजय असरानी (वय, ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. असरानी हे वांद्र पश्चिम येथील पेरी रोड येथील रहिवाशी आहेत. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय असून दररोज नियमितपणे ते मॉर्निंग वॉकला जात असे. दरम्यान, रविवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान असरानी टर्नर रोडवरून कार्टर रोडकडे जात होते. त्याचवेळी कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रक झाडाला घासून गेल्याने दोरी तुटली आणि लोखंडी वस्तू बाजूने जात असलेल्या असरानी यांच्या डोक्यात पडली.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेत असरानी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेबाबत असरानी यांच्या बहिणीला माहिती दिली. त्यानंतर असरानी यांच्या बहिणीच्या नवऱ्याने ट्रक चालकाविरोधात पोलिसांत तक्रार दिली. आलम अन्सारी (वय, ४९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. असरानी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.

वर्धा: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने अनोळखी व्यक्तीची हत्या

वर्ध्यातील देवळी भागात दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने अनोळखी व्यक्तीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.मिळालेल्या माहितीनुसार, विनोद डोमाजी भरणे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भरणे सोनेगाव मार्गाावरून जात असताना आरोपी करण मोहितेने त्यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. भरणे यांनी आरोपीला ओळखत नसल्याने स्पष्ट नकार दिला. यावर संतापलेल्या आरोपीने भरणे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने भरणे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर