Mumbai News: बदलापूर येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असताना मुंबईच्या कांदिवली येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. शेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने याआधी असे कृत्य केले का, याचा पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेरोजगार असून त्याने पीडिता खेळण्याच्या बहाण्याने उचलून नेले. परंतु, आरोपी हा मुलीसोबत गैरवर्तणूक करत असल्याचे असल्याचे एका महिलेने पाहिले आणि मुलीला त्याच्या मांडीवरून हिसकावून घेतले. या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्याने महिलेने मुलीचे आई- वडील आणि इतर शेजऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधून सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. समता नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रहिवाशांच्या तक्रारीच्या आधारे आम्ही आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली पोक्सो अंतर्गत अटक केली आहे.
आरोपीने याआधीही परिसरातील अनेक मुली आणि महिलांशी गैरवर्तणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. आरोपीने आणखी किती मुलींचा विनयभंग किंवा छळ केला, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि पोलिसांना आरोपांची पडताळणी करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायची असल्याने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये संताप आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या शिपायाला अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी राज्यभर निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी-सपाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याच्या विविध भागांत निदर्शने केली. राज्यात महिला व मुलींवरील अत्याचार वाढत असून अवघ्या दहा दिवसांत अशा १२ घटना घडल्या आहेत, अशी माहिती शिवसेना - यूबीटीच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली.