Mumbai Bhandup BMC Hospital News: मुंबईच्या भांडूप येथील महापालिकेच्या रुग्णालयात नवजात बाळ रडायचे थांबले नाही म्हणून त्याचे तोंड चिकटपट्टीनं बंद केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या ३ परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित महिलेने तिच्या बाळाच्या तोंडावर चिकटपट्टी लावलेली पाहिल्यानंतर तिने रुग्णालयातील परिचारिकेला याबाबत विचारणा केली. मात्र, त्यावेळी परिचारिकेने तिला गडबड करण्याची गरज नाही असे म्हणत ही गोष्टी सामान्य असल्याचे सांगितले.
प्रिया कांबळे असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. प्रिया यांनी २० मे २०२३ रोजी भांडुप येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच बाळाला काही समस्या उद्भवल्यास परत येण्यास सांगितले. बाळाला काही आजार झाल्याने प्रिया यांनी त्यांच्या बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. बाळावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
दरम्यान, २ जून २०२३ रोजी प्रिया त्यांच्या बाळाला पाहण्यासाठी एनआयसीयूमध्ये गेल्या. त्यावेळी प्रिया यांना त्यांच्या बाळाचे तोंड चिकटपट्टीने बंद केल्याचे दिसले. यानंतर प्रिया आणि त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांबळे कुटुंबाला तक्रार नोंदवण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. प्रियाच्या वकिलाने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगकडे मदत मागितल्यानंतर अखेर २२ फेब्रुवारी रोजी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणाची दखल घेतली.
तीन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत वैद्यकीय निष्काळजीपणाचे आणखी एक प्रकरण समोर आले. सहाव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर नवजात बाळाचा मृतदेह एका पेटीत भरून कुटुंबासह घरी पाठवण्यात आला. मात्र, कुटुंब घरी पोहोचले तेव्हा बाळ जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. परंतु, त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. सदर टुंबाने कुटुंबाने बाळाला जिवंत असल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ पाहून अनेका धक्का बसला.
संबंधित बातम्या