Mumbai Suicide News: मुंबईतील गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एक २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. परंतु, अभ्यासाच्या दबावातून तरुणाने आत्महत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धार्थ धारकसे (वय, २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंह नगर येथील रहिवासी आहे. सिद्धार्थ हा महाविद्यालयातील शेवटच्या वर्गात शिकत होता. सिद्धार्थने चांगले गुण मिळवावे अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. यामुळे ते सतत त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी दबाव टाकत होते, अशी माहिती समोर येत आहे.
एमएचबी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सिद्धार्थने गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला गोरेगाव पश्चिम येथील ऑस्कर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, दोन तासानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट न सापल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली.
ऑनलाइन गेमिंगच्या नादातून टॅक्सी चालकाने मुंबईतील वरळी सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ मोहम्मद हुसेन असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. हुसेनला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते.
भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.