खच्चून भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाजात उभा असताना हात सटकला आणि…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खच्चून भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाजात उभा असताना हात सटकला आणि…

खच्चून भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाजात उभा असताना हात सटकला आणि…

Updated Oct 16, 2024 08:42 AM IST

20-Year-Old Man Dies After Fallin From Train: डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान मुंबई लोकलमधून पडल्याने एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

धावत्या लोकलमधून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू
धावत्या लोकलमधून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू

Mumbai Local News: मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. मृत तरुण मुंबई लोकलच्या दरवाजाजवळ उभा होता. मात्र, गर्दीमुळे अचानक त्याचा हात सटकला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.

आयुष जतीन दोशी (वय, २०) असे धावत्या लोकलमधून पडल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील मधुकुंज सोसायटीत कुटुंबासह राहत होता.डोंबिवली गव्हर्नमेंट रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आयुष हा लोकलमधून पडल्याची माहिती मिळताच त्वरीत आम्ही घटनास्थळी पोहोचून त्याला जखमी अवस्थेत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यांनंतर त्याच्या आईला या घटनेबाबत माहिती देण्यात आली.' याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून रेल्वे पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मुंबई लोकमधील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ५ ऑक्टोबरपासून लोकलचे नवे वेळापत्रक जारी करण्यात आले. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जलद गाड्यांचे आगमन आणि प्रस्थान सीएसएमटीहून दादरला हलविण्यात आल्या आहेत. दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म ११ वरून या गाड्या धावत आहेत. मध्य मुंबईतील दादर, लोअर परळ, प्रभादेवी, वरळी आणि परळ या भागांमध्ये कार्यालये सुरू झाली आहेत, अशा ठिकाणी काम करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दादरहून अधिक जलद गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होत आहे. दादर ते परळ या धीम्या मार्गावरील २४ गाड्या हलवल्या आहेत.

मध्य रेल्वे ठाणे, कल्याण आणि पुढे उत्तरेकडे २२ गाड्या चालवत आहे. २४ सेवांची भर पडल्याने ही संख्या ४६ वर गेली आहे. कळवा आणि मुंब्रा येथे किमान चार जलद गाड्या थांबतील. सकाळच्या गर्दीच्या वेळेत दोन आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत दोन बदलापूर/आसनगाव/टिटवाळा-सीएसएमटी मार्गावर या गाड्या धावतात. मध्य मुंबईवर लक्ष केंद्रीत करून कळवा आणि मुंब्रा येथे जलद गाड्यांना थांबा देण्याच्या आमच्या सूचना रेल्वे प्रशासनाने स्वीकारल्याचा आम्हाला आनंद आहे, असे मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन यांनी सांगितले.

कुर्ला ते कल्याण दरम्यान नॉन एसी ट्रेनचे एसी लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. दररोज ६६ सेवा चालविणाऱ्या सहा वातानुकूलित गाड्यांच्या ताफ्यात दोन नवीन एसी रॅक दाखल होतील, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. अंतरानुसार प्रत्येक गाडी दिवसभरात १० ते १२ फेऱ्या करत असल्याने भविष्यात या दोन नव्या रॅकमुळे एसी सेवेत वाढ होणार आहे. एप्रिल-ऑगस्ट २०२४ च्या आकडेवारीनुसार सध्या मध्य रेल्वे दररोज ६६ सेवा चालवते आणि सरासरी ७६,४७७ प्रवाशांची वाहतूक करते. २०२३-२३ मध्ये ही संख्या ५७ हजार २१४ इतकी होती.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर