Mumbai Police: तरुणांमध्ये रिल बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकालचे तरुण- तरुणी रीलच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहात नाहीत.काही दिवसापूर्वी पुण्यातील एका तरुणीचा हात सोडून दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेला महिना उलटला नाही तोच, सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळी रस्त्यावर एक तरुण धोकादायक सायकल स्टंट करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
मेहुल चरणिया (वय, २०) धोकादायक सायकल स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहे. दरम्यान, ४ जून २०२४ रोजी मेहुल चरणिया आणि त्याच्या मित्रांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर केलेल्या सायकल स्टंटचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी धोकादायक सायकल स्टंट केल्याच्या आरोपाखाली मेहुल चरणियाला ताब्यात घेतले.
मुंबई पोलिसांचे तरुणांना आवाहन
मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'आपल्या जीवाशी खेळू नका! चेंबूरमध्ये राहणारा एक तरुण आपल्या मित्रांसोबत जीवघेणा स्टंट करत व्हिडिओ बनवत होता. आझाद मैदान पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली. आम्ही सर्व तरुणांना आवाहन करतो की, असे स्टंट करून आपला जीव धोक्यात घालू नये.'
स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित तरुण कारच्या वर चढून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे.शहरातील धोकादायक बाईक स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईचा हा भाग आहे.अलिकडच्या काही महिन्यांत स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापूर्वी पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर तरुणीचा धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. ही तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही हात सुटला तर जीवावर बेतू शकते, याची चांगली कल्पना असूनही हा स्टंट करण्यात आला. या स्टंटचे रेकॉर्डिंग करण्यासाठी कॅमेरामनसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीचा शोध घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच या पुढे अशाप्रकारचे स्टंट करताना दिसल्यास तुरुंगात टाकू, असाही त्यांना इशारा दिला.