Mumbai: अल्पवयीन मुलीचा हात धरून म्हणाला 'आय लव्ह यू'; कोर्टानं तरुणाला सुनावली दोन वर्षांची शिक्षा-mumbai 19 year old man jailed for holding minor girl hand telling her i love you ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: अल्पवयीन मुलीचा हात धरून म्हणाला 'आय लव्ह यू'; कोर्टानं तरुणाला सुनावली दोन वर्षांची शिक्षा

Mumbai: अल्पवयीन मुलीचा हात धरून म्हणाला 'आय लव्ह यू'; कोर्टानं तरुणाला सुनावली दोन वर्षांची शिक्षा

Aug 03, 2024 09:16 AM IST

Mumbai Man molested Minor Girl: अल्पवयीन मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला दोन वर्षाची शिक्षा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला दोन वर्षाची शिक्षा

Mumbai News: अल्पवयीन मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला मुंबईतील विशेष न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने बोललेल्या शब्दांमुळे १४ वर्षीय पीडितेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स म्हणजेच पोक्सो कायदा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अश्विनी लोखंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ३० जुलै २०२४ रोजी दिलेल्या आदेशात न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत विनयभंगाचा दोषी ठरवले. तर, पोक्सो कायद्याच्या कठोर कलमांतर्गत आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सप्टेंबर २०१९ मधील आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पीडित मुलगी जवळच्या दुकानातून चहापती आणायला गेली होती. मात्र, ती घरी रडत परतली. याबाबत पीडितेच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका मुलाने तिचा हात धरुन तिला 'आय लव्ह यू' म्हटले. यानंतर पीडिताची आई जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेली. त्यावेळी आरोपीने असा दावा केला की, त्याचे पीडितासोबत प्रेमसंबंध असून घटनेच्या दिवशी तिनेच त्याला भेटायला बोलवले होते.

याप्रकरणी पीडिताच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असता न्यायाधीश म्हणाले की, पीडिता चहापती विकत घेण्यासाठी जात असताना आरोपीने फौजदारी बळाचा वापर केल्याचे सिद्ध झाले. आरोपीने बोललेल्या शब्दांमुळे पीडितेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. घटनेच्या दिवशी पीडिता १४ वर्षांची होती. पीडिताचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असते तर तिने याबाबत तिच्या पालकांना का सांगितले असते? असाही प्रश्न न्यायालयाने उपस्थित केल आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

उरण हत्याकांडप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक

उरण रेल्वे स्थानकाजवळ एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर तीन दिवसांनी उत्तर कर्नाटकातील डोंगरात लपून बसलेल्या २३ वर्षीय तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी दाऊद शेख (वय, २३) याला मंगळवारी सकाळी कर्नाटकातील कलबुर्गी जवळील शहापूर डोंगरावर पाठलाग करून अटक करण्यात आली.त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. इतर आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईला नेण्यासाठी नवी मुंबई पोलिस कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधत आहेत. २७ जुलै रोजी यशश्री शिंदे यांचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकालगतच्या झुडपात आढळून आला होता. २५ जुलै रोजी ती कामावरून घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. शेख आणि शिंदे यांच्यात २०१९ पासून प्रेमसंबंध होते. मात्र, शिंदे यांच्या कुटुंबीयांनी या नात्याला नकार दिला.

 

विभाग