Mumbai Goregaon Quarry Drowning News: मुंबईच्या गोरेगाव येथे शुक्रवारी (१० ऑगस्ट २०२४) सकाळी धक्कादायक घडली. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाला पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात शोककळा परसली आहे.
साहिल अन्सारी (वय, १८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साहिल हा गोरेगाव पूर्व येथील आदर्श नगर येथील रहिवासी होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत दहिसर पूर्व येथील वैशाली नगर येथील एका खाणीत गेला. पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. परंतु, अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यानंतर त्याच्या मित्रांनी १०० क्रमांकावर फोन करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास साहिल पाण्यात बुडाला. त्यानंतर तब्बल चार तासानंतर पावणे पाच वाजता त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याला त्वरीत जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी साहिलच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपप्रचार नाकारला आणि कोणाविरुद्धही तक्रार दाखल केली नाही.
रत्नागिरीतील मालगुंड मराठवाडी येथे धरणात पोहायला गेलेल्या अल्ववयीन पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ राजेंद्र राणे (वय, १७)असे मत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पार्थ हा गुरूवारी मालगुंड येथे आल्यानंतर तो आपल्या चार मित्रांसोबत सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी मालगुंड मराठवाडी येथील धरणात गेला. मात्र, पोहताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि पाण्यात बुडू लागला.
हा प्रकार त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी पार्थला पाण्यात बाहेर काढले आणि बेशुद्धावस्थेत त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. पार्थ हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका मुलगा असून इयत्ता बारावीत शिकत होता. पार्थच्या मृत्युने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण मालगुंड गावावर शोककळा पसरली आहे. पार्थच्या पश्चात त्याचे आई-वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईक असा परिवार आहे.