Mumbai News: मुंबईतील कांदिवली परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली. कांदिवली पश्चिम येथील मंगलमयी इमारतीजवळील गटारात १४ कुत्रे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या कुत्र्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप श्वानप्रेमींनी केला आहे. कांदिवली येथील रहिवासी हिना लांबाचिया यांनी याबाबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सोमवारी पहाटे १.२४ वाजता कांदिवली पोलिसांनी प्राण्यांच्या क्रूरतेप्रकरणी गुन्हा नोंदवला. दस्तऐवजात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३२५ आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
मुंबईत एका व्यक्तीने क्रौर्याची परिसीमा ओलांडून आपल्या अडीच वर्षांच्या सावत्र मुलीची निर्घृण हत्या केली. मानखुर्द परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये ही घटना घडली. मानखुर्द पोलिसांनी खून आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा टेम्पो चालक आहे तर मुलीची आई इतर लोकांच्या घरी घरकाम करते. सावत्र मुलगी असल्याने तो तिला पसंत करत नव्हता, असे आतापर्यंत पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. पत्नीच्या अनुपस्थितीत त्याने ८ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. घरी परतल्यावर तिला मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याने तिने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने सांगितले की, जेव्हा तो टेम्पो चालवून घरी परतायचा, तेव्हा त्याची सावत्र मुलगी रडायची, ज्यामुळे त्याला राग यायचा. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी मुलगी पुन्हा रडली. यावर संतापलेल्या आरोपीने मुलीला बेदम मारहा केली. पीडितेची आई घरी पोहोचली तेव्हा तिला आपली मुलगी झोपले असे वाटले. परंतु, तिला आवाज देऊनही ती उठली नाही. यामुळे तिच्या आईला संशय आला. तिने तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.