Mukhyamantri mazi ladki bahin yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना सरकारकडून प्रति महिना १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचे पहिले दोन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आधार बँकेला लिंक नसल्यानेअद्याप काही महिलांच्या खात्यातपैसे जमा होणे बाकी आहे. सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जात असताना विरोधकांनी याच्या प्रचारावर केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच आता महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेसाठी पुढे सरसावली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या योजनेवर महत्वाचे भाष्य केले आहे.
अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणून मास्टर स्ट्रोक खेळला आहे. ही योजना सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या योजनेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण योजना टर्निंग पॉईंट अजिबात ठरणार नाही. तर ती त्यांच्यासाठी यू टर्न ठरेल. महाराष्ट्र सरकारने याआधी अशा खूप योजना राबवलेल्या आहेत. ही काही नवीन योजना किंवा क्रांती नाही. दीड हजार रुपये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या खिशातून देत नाहीत. लोकांच्या करातूनच हे देत आहेत. महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आमचं सरकार सत्तेत आल्यास आम्ही या योजनेच्या रक्कमेत दुप्पट वाढ करून आम्ही महिलांना प्रतिमहिना ३००० रुपये देऊ, हा आमचा शब्द असल्याचे राऊत म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीणसह सर्व कल्याणकारी योजना बंद करतील, ते सावत्र भाऊ असल्याची टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत. त्यांचे राज्य जाईल,अशी त्यांना भीती वाटत आहे. ते हरत आहोत म्हणून त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते लोकांना धमक्या देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी राजकीय इतिहास माहीत नसेल. त्यांनी या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे.