Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती देत अपात्र महिलांचा आकडा एक्सवर पोस्ट करत दिला आहे. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांना सात महिन्याचे दरमहा १५०० रुपये मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता २० तारखेपर्यंत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच सरकारकडून प्राप्त अर्जाची छाननी सुरु केली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १, १०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी तारणहार ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने जुलै २०२४ पासून ही योजना लागू केली. ही योजना लागू केल्यापासून चर्चेत असून विरोधकांनी सातत्याने यावर टीका केलीआहे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक योजना, अनुदान बंद करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी महायुती सरकारवर केला आहे.
त्याचबरोबर या योजनेमुळे महाआघाडी सरकारची महत्वाकांक्षी योजना शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याचा दावाही केला जात आहे. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचा आकडा ३० लाखांवर आणला जाणार असल्याचा मोठा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
संबंधित बातम्या