राज्य सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळू लागला आहे. आज पुण्यातील बालेवाडी येथील कार्यक्रमातून महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या पहिल्यादोन हफ्त्यांची रक्कम जमा झाली आहे. सरकारने १४ ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा करण्यास सुरुवात केली असून आज संध्याकाळपर्यंत १ कोटी ३ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
अदिती तटकरे यांनी म्हटले की,१ कोटी ३५ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या,त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल.महिला भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’च्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकास कामांना सहकार्य करावे.