Eknath shinde on Mahji Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, अनेक गोष्टींची पुरेशी माहिती नसल्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यातच योजनेचे अर्ज देण्यासाठी तलाठी लाच मागत असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ‘योजनेचे अर्ज देताना कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेविषयी महिलावर्गाला पुन्हा आश्वस्त केलं. बुलढाण्यात एका महिलेला योजनेचा अर्ज देताना तलाठ्यानं तिच्याकडं पैशाची मागणी केल्याचं आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे. त्यामुळं महिला भगिणींनी काळजी करू नये. ज्यांच्याकडं जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल, मतदार ओळखपत्र असेल, पिवळं किंवा केशरी रेशनकार्ड असेल अशा सर्वांचा डेटा आपल्याकडं तयार आहे. त्याचा वापर करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल. महिलांनी गडबडून किंवा घाबरून जाण्याची गरज नाही,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डोमिसाइलची सक्ती केली जाणार नाही. त्याऐवजी वरीलपैकी कुठलंही एक ओळखपत्र चालेल, असंही त्यांंनी सांगितलं.
'राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. ही योजना अत्यंत जिव्हाळ्यानं सुरू केलेली आहे. त्याशिवाय, मोफत सिलिंडरचीही योजना आहे. एक व्यापक विचार करून ही योजना सुरू केलेली आहे. या योजनांचा लाभ सर्व पात्र महिला भगिनींना मिळावा, त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कुचंबणा होऊ नये. त्यांच्याकडून कसलीही पैशाची मागणी होऊ नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. यात कुठलीही कसूर झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
वारकऱ्यांच्या दिंड्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर विरोधकांनी टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. 'विरोधकांना आता वारकरी दुश्मन वाटू लागलेत. आम्ही वारकऱ्यांना पैसे देतोय हे पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. वारकरी समाधानी आहेत याचा आम्हाला आनंद आहे. विरोधक काय बोलतायत त्याकडं आम्ही लक्ष देत नाही. त्यांना कधी वारकऱ्यांना मदत देता आली नाही. पण आम्ही दिली. हे सगळं कसं होऊ शकतं असा प्रश्न त्यांना पडलाय. पण आम्ही या सगळ्या योजनांसाठी आर्थिक तरतूद केली आहे, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या