लाडकी बहीण योजनेत लाडक्या भावांचेही अर्ज! तब्बल १२ जणांनी घेतला लाभ; असा झाला उलगडा-mukhyamantri majhi ladki bahin yojana 12 male applicants forms rejected in chhatrapati sambhajinagar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाडकी बहीण योजनेत लाडक्या भावांचेही अर्ज! तब्बल १२ जणांनी घेतला लाभ; असा झाला उलगडा

लाडकी बहीण योजनेत लाडक्या भावांचेही अर्ज! तब्बल १२ जणांनी घेतला लाभ; असा झाला उलगडा

Sep 13, 2024 02:39 PM IST

Ladki Bahin yojana scam : राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. संभाजी नगर येथील १२ पुरुषांनी या योजनेत अर्ज केल्याचं उघड झालं आहे.

लाडक्या बहीण योजनेत लाडक्या भावांचे अर्ज! तब्बल १२ जणांनी घेतला लाभ; असा झाला उलगडा
लाडक्या बहीण योजनेत लाडक्या भावांचे अर्ज! तब्बल १२ जणांनी घेतला लाभ; असा झाला उलगडा

Sambhajinagar Ladki Bahin yojana scam : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. मात्र, या योजनेतील अनेक गैरप्रकार आता पुढे येऊ लागले होते. सातारा येथे एका व्यक्तीने पत्नीच्या नवे ३० अर्ज भरल्याचे प्रकरण ताजे असतांना आता संभाजी नगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल १२ लाडक्या भवांनी बनावट नाव वापरुन आधार कार्डचा वापर करून या योजनेचा लाभ घेतला असल्याचं उघड झालं आहे. कन्नड तालुक्यात ही घटना घडली असून १२ जणांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरून शासनाची फसवणूक केली आहे.

सरकारने पीडित, शोषित आणि गरजू महिलांना आर्थिक लाभ देण्याच्या हेतूने तब्बल १ कोटी ५९ लाख महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या साठी राज्य भरातून महिलांनी अर्ज केले. सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा देखील केले आहेत. मात्र, या योजनेचा आता अनेक जण गैरफायदा घेत असल्याचं दिसून येत आहे. संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकार ?

संभाजी नगर येथील कन्नड तालुक्यातील १३ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरले. पडताळणी करतांना ही घटना उघडकीस आली आहे. तपासणी करत असतांना १२ अर्ज ही महिलांचे नसून पुरूषांचे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या पुरुषांनी अर्जावर महिलेचा फोटो लावला होता. मात्र, आधार कार्डवर त्यांची नावे जैसेत थे होती. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. संभाजी नगरातील कन्नड तालुक्यतून या योजनेसाठी तब्बल ९२ हजार ९८ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील ९० हजार ९५७ अर्ज मंजूर देखील करण्यात आले आहे. तर इतर जर काही कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, शासनाची फावणूक केल्या प्रकरणी १२ जणांवर कारवाई करण्यासाठी प्रस्थाव पाठवण्यात आला आहे.

साताऱ्यात एकाच व्यक्तीने महिलेच्या नावावर भरले होते ३० अर्ज

सातारा येथे एकाने आपल्या पत्नीच्या नावाने या योजनेसाठी तब्बल ३० अर्ज भरल्याचे उघड झाले होते. या सर्व अर्जांचा आर्थिक लाभ त्यांना मिळाला होता. या साठी त्याने नवी मुंबईतील महिलांच्या आधार क्रमांकाचा वापर केला होता. संबंधित महिलांनी योजनेसाठी अर्ज सादर केला होता. मात्र, त्यांचा अर्ज भरला जात नसल्यानं या गैरप्रकाराचा भंडाफोड झाला होता. आरोपी पती पत्नीला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

Whats_app_banner