Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत किती अर्ज आले माहित्येय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत किती अर्ज आले माहित्येय?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत किती अर्ज आले माहित्येय?

Jul 18, 2024 12:13 PM IST

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्यातील महिलांची धावपळ सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Ladki Bahini Yojana Application Form Online: राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अवघ्या दोन आठवड्यात ४४ लाख महिलांनी अर्ज केला आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

राज्य महिला आणि बालकल्याण सचिव अनूप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझा लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत राज्यातील ४४ लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. याशिवाय, ऑफलाइन अर्ज देखील प्राप्त झाले आहेत." या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल. तर, शहरी भागतील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी लागेल.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही योजना राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै २०२४ होती. मात्र, त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला आहे. यातील पात्र लाभार्थ्यांची यादी १६ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. १५ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होईल, असा अंदाज आहे. सप्टेंबरपासून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला महिलेच्या खात्यात १५०० जमा होतील, अशी माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, एक लाख १० हजार महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून दीड हजार रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडक्या बहीण योजनेस अपात्र ठरल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या