Shivneri Bus : विमानातील हवाई सुंदरीप्रमाणेच आता एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivneri Bus : विमानातील हवाई सुंदरीप्रमाणेच आता एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

Shivneri Bus : विमानातील हवाई सुंदरीप्रमाणेच आता एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

Updated Oct 01, 2024 09:29 PM IST

Msrtc News : विमानात जशी हवाई सुंदरी प्रवाशांचे स्वागत करते. अगदी तशाच पद्धतीने आपल्या एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ हसतमुखाने प्रवाशांचे स्वागत करताना दिसणार आहे.

शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

हवाई सुंदरी हे विमान प्रवासाचे खास वैशिष्ट्ये असते. विमानात जशी हवाई सुंदरी प्रवाशांचे स्वागत करते. अगदी तशाच पद्धतीने आपल्या एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ हसतमुखाने प्रवाशांचे स्वागत करताना दिसणार आहे. शिवसेना नेते व एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी याबाबत घोषणा केली आहे.

मात्र ही सेवा केवळ एकाच मार्गावर देण्यात येणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी प्रवाशांना मदत करण्यासाठी आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा दिली जाणार आहे. ही अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये दिली.

एसटी महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यास मान्यता देण्यात आली.

बसस्थानकांवरआनंद आरोग्य केंद्र सुरू होणार -

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर "आनंद आरोग्य केंद्र" या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणारआहे. याच्या माध्यमातून अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. येथे आरोग्य तपासणी दवाखाना,  पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरूकेले जाणार आहे.

बसस्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉलसाठी जागा -

राज्यातील प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्रीसाठी नाममात्र भाडे आकारुन दहा बाय दहा आकाराचा स्टॉल उपलब्ध दिला जाणार आहे. याबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर