MSRTC Bus Fare News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीच्या भाड्यात १४.९५ टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासूनच (२५ जानेवारी) लागू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाचे (वाहतूक) अपर मुख्य सचिव आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आणि परिवहन आयुक्तांसह प्रमुख सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एसटी महामंडळाच्या (MSRTC) बसेसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावावरील निर्णय सर्वात महत्त्वाचा होता. डिझेल, चेसिस आणि टायरच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावरील खर्चाचा हवाला देत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी एसटीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली होती. नवी भाडेवाढ हकीम समितीच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली आहे. नवीन भाडे दर २४ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपासून लागू होतील आणि २५ जानेवारीपासून पूर्णपणे लागू होतील. सुधारित भाडे मानक बसेस, एक्सप्रेस सेवा, स्लीपर बसेस आणि वातानुकूलित बसेससह विविध प्रकारच्या सेवांना लागू होईल.
प्रवाशांना आता अधिक पैसे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, नियमित बसमधील ६ किमी प्रवासाचे भाडे ८.७० रुपयांवरून १०.०५ रुपयांपर्यंत वाढेल, इतर सेवा प्रकारांसाठी आताच्या भाड्याच्या प्रमाणात वाढ होईल.
भाडेवाढीव्यतिरिक्त महामंडळाच्या बैठकीत नवीन बस डिझाइनला मंजुरी देण्यात आली. महामंडळानं MSRTC साठी टोमॅटो रेड कलर स्कीमसह पर्यावरणपूरक नवीन BS6 स्टँडर्ड बसेसनाही मान्यता दिली आहे.
MSRTC ला नवीन इलेक्ट्रिक बसेसच्या रंगसंगतीसाठी देखील मान्यता मिळाली आहे. 50 ई-बससाठी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाला मान्यता देण्यात आली आहे आणि सध्याच्या शिवशाही बसेसच्या अनुषंगानं १०० ई-बससाठी निळ्या रंगाला मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या अखत्यातरीत असलेलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक सेवेपैकी एक आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५,००० बसेस असून दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.
संबंधित बातम्या