MSRTC Cancelled seasonal Ticket Hike : राज्य परिवहन महामंडळाकडून दर वर्षी दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता तसेच एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र यंदा दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील नियमित प्रवाशांना तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाला नियमित फेऱ्यांमध्ये सध्या दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीतील हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र ६ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला जवळपास ९५० ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र महामंडळाच्या निर्णयाने एसटीला या महसुलाला मुकावे लागणार आहे.
२५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढीसंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीसाठी हंगामी भाडेवाढ लागू नव्हती.
हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारा अतिरिक्त महसूल यंदा मिळणार नाही. हंगामी भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
दिवाळीच्या काळात व दिवाळीनंतर काही दिवस नागरिकांच्या प्रवास होत असतो. मात्र १०टक्के हंगामी भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या