MPSC Extended Maximum Age Limit : राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मोठा निर्णय घेत राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारीघेतला होता. या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने सरकारी नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाच्याया निर्णयाने आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आता येत्या ५ जानेवारीला होणारी गट-ब आणि २ फेब्रुवारीला होणारी गट-क परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
आयोगाने कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी करत होते. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावाही केला होता,अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून एमपीएससीसाठीची कमाल वयोमर्यादा ओलंडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णायाचा फायदा राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गासाठी (मराठा समाज) २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमपीएससीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतर आता आयोगाने या जाहिरातींमध्ये बदल केला आहे. आयोगाच्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२४ ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही,अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमयदित शिथिलता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व गट क या १८१३ जागांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्जाची संधी उमेदवारांना मिळणार आहे. यासंदर्भात लवकरच एमपीएससीकडून परिपत्रक येण्याची शक्यता आहे. वयोमर्यादेमध्ये शिथीलता देण्यात आल्याने आता ५ जानेवारीला होणारी गट-ब तसेच २ फेब्रुवारीला होणारी गट-क परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी सर्वाधिक पदे ही गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. यामुळे विद्यार्थी या परीक्षेची जाहिरात कधी निघणार याची वाट बघत असतात. यावर्षी संयुक्त परीक्षेची जाहिरात सहा महिने विलंबाने प्रसिद्ध करण्यात आली. यात संधी हुकलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार आहे.
संबंधित बातम्या